सुडाचा प्रवास

सुडाचा प्रवास 

सुई हरवली आहे तिथेच ती शोधली पाहिजे. ती अंधारात हरवली असेल तर अंधारात शोधा. आपल्याला स्वच्छ प्रकाशात दिसते म्हणून प्रकाशात जाऊन तिथे शोधत बसला तर सुई सापडणार नाही. तेंव्हा अबकी बार कोणतेही सरकार आले तरी मतदारांशी गद्दार होऊ नका एवढेच या राजकीय खेळा नंतर सांगणे.त्यातून यापुढे वैयक्तिक कारणांमुळे सुडाच्या प्रवासाचा प्रारंभ कोणी करू नये ,त्याचा अंत सुड उगवण्यातच होतो.

...आणि अखेरीस लोकप्रतिनिधीच्या अपात्रते संदर्भातील निकाल बुधवारी लागला. या निकालानुसार शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचे विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले. तसेच दोन्ही पक्षाच्या कोणत्याच सदस्याला अपात्रही ठरवले नाही. सहाजिकच अपात्र  ठरवण्याकरता लढवल्या गेलेल्या या खटल्यात कोणीच अपात्र ठरले नसल्याने पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे. या निकालानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत त्याच बरोबर स्वतः उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यामुळे हे वातावरण अधिकाधिक गढूळ होण्यास मदतच होणार आहे.आणि परिस्थिती पहाता हा गढूळपणा संपणे आता अशक्य आहे. अवघड आहे. राहुल नार्वेकर देणार असलेला निकाल आमच्या विरोधात आहे ,तो आम्हाला मान्य नाही. त्याच्या विरोधात आम्ही असू असा राग उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी निकालापूर्वीपासूनच आळवणे सुरू केले होते .याचा महत्त्वाचा भाग म्हणजे एकतर निकाल आपल्या विरोधात जाणार हे त्यांना माहिती होते. हे माहीत असण्याचे कारण म्हणजे आपण जे पुरावे आणि खटला लढलो आहे तो फारसे दमदार नव्हता हे त्यांना माहिती होते. मात्र असे मान्य करणे नक्कीच अवघड असल्याने त्यांनी न्याय देणारा पक्षपाती आहे हे सांगायला सुरुवात केली. दुसरा मुद्दा म्हणजे आपल्यापेक्षा अधिक वरचढपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मांडणी केली आहे हे लक्षात आल्यावर आपण पराभूत होणार हे त्यांना समजून आले असावे. 
अर्थात हा प्रकारही मान्य करणे उद्धव ठाकरे गटाला शक्य नव्हते. म्हणून यातील सोपा मार्ग म्हणजे निकाल पक्षपाती आहे. राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे निकाल देणार नाहीत. दिला नाही, हे म्हणणे सोपे आहे. आता राहुल नार्वेकर यांनी निकाल योग्य दिला आहे, की नाही याबाबत शिव्याशाप देण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयात जाणे हा एक सनदशीर मार्ग आहे. त्याचा अवलंब उद्धव ठाकरे करणारच आहेत. दुसरा मार्ग म्हणजे या प्रकरणा वर स्वच्छ अंत:करणाने पडदा टाकायचा व निवडणुकीच्या तयारीला ही वाया जाणारी शक्ती लावायची. मात्र हे करणे म्हणजे आपण लढवय्या नाही असे इतरांना वाटेल असा समज करून उद्धव ठाकरे यावर पडदा टाकण्यास तयार नाहीत. यातून जे घडणार आहे , त्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जावे आणि न्याय मिळवावा असा सल्ला दिला आहे. हा सल्ला म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र असा एक भाग होतो, किंवा स्वतःच्या पक्षाबाबत अशीच घटना घडली तर न्यायालयात गेल्यावर काय घडू शकते याची चाचपणी ! शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्या वेळ आणि पैशावर ही चाचपणी करून घेत आहेत,असे म्हणण्यास वाव आहे. आज शिवसेनेचे जे झाले ते उद्या राष्ट्रवादीचे होऊ शकणार नाही असे नाही. त्यामुळे सर्व शक्यता तपासून घेणे हा शरद पवार यांच्या नियोजनाचा भाग असू शकतो. हे म्हणण्याचे कारणही शरद पवार यांनी स्वतःच्या पक्ष फुटी नंतर न्यायालय वा कोर्टकचेऱ्या करण्याच्या बाबतीत उदासीनता दाखवली होती. आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, पुन्हा एकदा पक्ष बांधणी करू असे सांगत महाराष्ट्रभर दौरे काढण्याचा विचार व्यक्त केला होता. मात्र उद्धव ठाकरे यांना कोर्टकचेऱ्या करा आणि न्याय मिळवा असा सल्ला त्यांनी दिला आहे. अर्थात शरद पवार स्वतःच्या बाबतीत जे बोलतात त्याच्या नेमके विरुद्ध वागतात हे आजपर्यंतच्या घटनांवरून महाराष्ट्र राज्याला समजले आहे. त्यामुळे उद्या वेळ आली तर ते नक्कीच कोर्टकचेर्या करतील यात शंका नाही.
 आता पुन्हा मूळ विषयाकडे येताना हे लक्षात येते की निकालाच्या बाजूने व विरोधात प्रतिक्रियांचा पाऊस हा पडणारच होता. ज्यांच्या मनासारखा निकाल लागला म्हणजेच एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने हा निकाल लागल्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अजित पवार यांनाही हा निकाल म्हणजे दिलासाच आहे. थोडक्यात महायुतीच्या दृष्टीने निकाल पथ्यावर पडणारा आहे. आता हा निकाल पथ्यावर पडावा अशीच आखणी केल्याचे विरोधक म्हणत असताना लोकशाहीचा गळा घोटल्याची भाषा ही बोलली जात आहे. यात एक सत्य आहे आणि ते म्हणजे घराणेशाहीत  निर्माण झालेले पक्ष लोकशाहीच्या समर्थनार्थ जेंव्हा बोलतात तेंव्हा ते हास्यास्पदच असते. याचे कारण ,मी पक्षप्रमुख आहे. मीच पक्ष आहे. मी सांगीन तेच होणार. माझेच ऐकले पाहिजे. मलाच कळले पाहिजे. सांगितले पाहिजे. या स्वयंकेंद्री वर्तुळातून असा पक्ष चालवणारी मंडळी कधीच बाहेर पडत नाहीत.(राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत निवडणुकीत, धोरण ठरवताना पवार सांगतात तेच हा मुद्दा पुढे न्यायालयात येईलच) याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना अगदीच एॅड. बाळासाहेब आंबेडकर चालवत असलेला वंचित पक्ष या सर्व ठिकाणी लोकशाही म्हणजे, त्यांच्या भक्तजनांनी, समर्थकांनी मान्य केलेली घराणेशाही अर्थात हुकूमशाहीच असते. अशा मंडळींनी, लोकशाहीची हत्या नार्वेकर यांनी केली म्हणून गळा काढणे फारसे संयुक्तिक नाही. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस सारखा पक्ष ही अशाच घराणेशाहीला शरण गेलेला आहे.  अशा परिस्थितीत प्रादेशिक पक्षांनी हुकूमशाही आणि लोकशाही यातला फरक सर्वसामान्यांना समजावून सांगणे म्हणजे मोठा विनोद आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत असताना, शिवसेना कोणाची आहे हे लहान मुलगाही सांगू शकेल असे सांगत तो पक्ष आपली आहे. वडिलोपार्जित इस्टेट असल्यासारखे मत प्रदर्शित केले. लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष ही कोणाची खाजगी मालमत्ता असत नाही हे मूलभूत तत्त्वच ठाकरे, पवार, गांधी किंवा दक्षिणेतील अनेक प्रादेशिक पक्ष नेते विसरून गेले आहेत. मी माझ्यासाठी पक्ष काढला आहे आणि तो भारत नावाच्या देशातील लोकशाहीने चालणाऱ्या प्रक्रियेचा एक भाग आहे अन्यथा आम्ही राजकीय दृष्ट्या परिपूर्ण व स्वतंत्र आहोत अशा गुर्मीत या पक्षांची वाटचाल सुरू आहे. भारतीय जनता पक्षाबाबत कोण्या एका व्यक्तीच्या विचारधारेचा व पक्ष चालवण्यासाठी कोण्या एका परिवाराचा विचार घेतला जात नाही किंवा केला जात नाही. एकीकडे पंकजा मुंडे यांना राजकारणातून बेदखल केल्याचे पाहून विरोधक त्यांना राजकारणात आणले पाहिजे. पंकजा मुंडेंवर अन्याय आहे. असा टाहो फोडतात तेव्हा हे दुहेरी विचारधारेचे नेते असल्याचे स्पष्ट होत असते. 
निकालाचा विचार केला तर ही वेळ येण्याचे कारण 2019 साला ज्या प्रकारे शरद पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेस यांना एकत्र घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली आणि सुडाची ठिणगी पेटवली तिथे आहे.आज त्याचा वणवा झाला आहे .शिवसेना आणि भाजप यांच्यात त्यावेळी अंतर्गत वाद होता तर त्यांना त्यांच्या परिस्थितीवर राष्ट्रवादी विशेषता शरद पवार यांनी सोडून दिले असते तर जे व्हायचे असते ते झाले असते. आज जी निवडणूक घेण्याची वारंवार मागणी केली जाते ती त्यावेळी केली असती तर अधिक संयुक्तिक झाले असते. मात्र सत्ता मिळवण्याच्या व वैयक्तिक मानवपानाच्या अघोरी मानसिक तेथून तीन पक्षांचा जुगाड करून शरद पवार यांनी सत्ता काबीज केली. त्यांनी हा फोडाफोडीचा मार्ग, पायवाट तयार केली. त्या पायवाटेवर भारतीय जनता पक्षाने महामार्ग उभा केला. शरद पवार यांनी अख्खी शिवसेना फोडली तर भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादीतील 40, 40 आमदार फोडले आणि सत्ता स्थापन केली .फोडा आणि सत्ता स्थापन करा हा शरद पवार यांचाच मंत्र भाजपने पुढे नेला, मग तो चुकीचा आहे त्या विरोधात दाद मागावी असे म्हणण्याचे खरे तर काहीच कारण नाही. भारतीय जनता पक्षाने शिवसेने विरोधात दाद मागितली नाही . युती म्हणून निवडणुका लढल्यावर ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्यांच्याबरोबर सत्तेत जाणे ही फसवणूक होती. पण तरीही भाजपने न्यायालयात याबाबत दाद मागितली नाही. अडीच वर्ष वाट पाहून तेच सूत्र वापरून सत्ता पुन्हा मिळवली. आता पुढची निवडणूक आठ महिन्यांवर आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसने पुन्हा एकदा व्युहरचना करावी आणि मैदान मारावे. या प्रकरणाला सुरवात व रंगत  नाना पटोले यांचा राजीनामा, विधानसभा अध्यक्ष नेमुन देणे, उद्धव ठाकरे यांनी भावनेच्या भरात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणे या घटनांमुळे आली.महायुतीला सत्ता घालवावी लागली.आता कोर्टकचेर्या आणि एकमेकांच्या विरोधात उलटे-सुलटे वक्तव्य करून वेळ घालवू नये. ज्या ठिकाणी सुई हरवली आहे तिथेच ती शोधली पाहिजे. ती अंधारात हरवली असेल तर अंधारात शोधा. आपल्याला स्वच्छ दिसते म्हणून प्रकाशात जाऊन तिथे शोधत बसला तर सुई सापडणार नाही. तेव्हा अबकी बार कोणतेही सरकार आले ,तरी मतदारांशी गद्दार होऊ नका एवढेच या राजकीय खेळा नंतर सांगणे.
मधुसूदन पतकी
१०.०१.२०२४ 

Comments

Popular posts from this blog

संविधान धोक्यात ?

हम पांच

अशक्त दंडातल्या बेडकीचा आक्रोश