अशक्त दंडातल्या बेडकीचा आक्रोश

अशक्त दंडातल्या बेडकीचा आक्रोश

बाबरी मशिदीचे पतन त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ...तर मला त्याचा अभिमान आहे हे म्हणणे आणि सुंदरसिंग भंडारी यांनी ते काम शिवसेनेचे असावे असे सांगणे यातून ठोस निर्णय आणि जबाबदारी कोणीच घेतली नव्हती . भाजपनी ती घ्यायला पाहिजे होती.थोडक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी आणि शिवसेना या सगळ्यांनी मिळून केलेली ही व्युहरचना असावी. न्यायालयीन डावपेच कसे लढवायचे हा त्यामागचा विचार होता. त्यामुळे आजच्या परिस्थितीत उबाठा चे प्रवक्ते संजय राऊत यांनी ,आम्ही बाबरी मशीद पाडली ही अशक्त दंडातील बेडकी फुगवून दाखवू नये .त्यापुढे शिवसेनेने बाबरी मशीद पाडण्यात सहयोग दाखवला असेल ही मात्र उभारण्यात त्यांनी पाठ फिरवली होती. ते त्यांच्या नआवाक्यात नव्हते हेही मान्य करायला पाहिजे. नष्ट करणाऱ्या पेक्षा निर्माण करणारा नेहमीच मोठा ठरतो.

आयोध्या मध्ये होणाऱ्या होणाऱ्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास हा अग्रलेख लिहीपर्यंत उद्धव ठाकरे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे प्रमुख आहेत त्यांना सोहळ्याचे निमंत्रण दिले गेलेले नव्हते. सोहळ्याचे निमंत्रण आम्हाला तसेच उद्धव ठाकरे यांना दिले जाणारच नाही, असे सुतोवाच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. राम मंदिर लोकार्पणाच्या निमंत्रणाचे सांगावे जसे येऊ लागले तसे यात आपली डाळ शिजणार नाही हे संजय राऊत यांना त्यावेळी नक्की समजले असावे. मुद्दा असा होता की यासंदर्भात आपण ओरडा आरडा केला तर शेवटच्या टप्प्यात का होईना आपल्याला निमंत्रण पाठवले जाईल किंवा न पाठवल्यास दररोज सकाळी जे तर्कशून्य ,बेताल, बेहिशोबी वक्तव्य करण्याचे कागदी धनुष्य त्यांनी उचलले आहे ते त्यांना आनंदाने पेलता येईल .खरे तर उद्धव ठाकरे यांच्या अगोदर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण आल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा वर झालेल्या जखमेवर तिखट आणि मीठ चोळले गेले. केवळ एक आमदार या व मागच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आला असताना पक्षप्रमुख म्हणून राज ठाकरे यांना जे महत्त्व दिले गेले ,त्याचा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. अर्थात या संतापाचा उपयोग त्यांना काहीच होण्याची शक्यता नाही. मंदिर वही बनायेंगे तारीख नही बतायेंगे यासारख्या टोमणेअस्त्राचा वापर उद्धव ठाकरे यांनी वारंवार केला. एक कोटी रुपये दान दिल्यावर त्याचा हिशोब मागितला. मुख्य म्हणजे राम मंदिर होऊ नये असे ज्या पक्षाला वाटत होते आणि निधर्मी म्हणून जे कायम शड्डू ठोकत होते अशा राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांबरोबर उद्धव ठाकरे यांनी केलेली आघाडी ही भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या बांधव संघटनांना आणि मुख्य म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अजिबात मान्य झालेली नाही . अशावेळी भारतीय जनता पक्षाचे नेतृत्वही उद्धव ठाकरे यांना फार सन्मानाने लोकार्पण सोहळ्यास बोलवेल असे वाटून घेणे म्हणजे उद्धव ठाकरे गटाने दिवा स्वप्न पाहणे होय.विशेष म्हणजे ज्यांचे बोट धरून राजकारण शिकले त्या शरद पवारांना ही सोहळ्याचे निमंत्रण दिलेले नाही. या सगळ्याची पार्श्वभूमी पाहिली तर राम मंदिर उभारणी हा भारतीय जनता पक्षाने केलेला निर्धार होता. लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली रथयात्रा आणि त्यानंतर आज प्रत्यक्षात राम मंदिर उभे करून त्याचे लोकार्पण करणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतचा प्रवास पाहिला तर शिवसेनेचा उल्लेख विवादास्पद घुमट पाडण्याच्या वेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जर बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल ,तर मला त्याचा अभिमान आहे या वाक्याशी जोडला जातो. खरे तर चार शिवसैनिकांनी मशीद व विवादास्पद ढाच्या पाडणे शक्य नव्हते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भारतीय जनता पक्षाचे कारसेवक त्यासाठी सज्ज होते आणि त्यांनीच तो घाट घालून पूर्णत्वास नेला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जर तर च्या विधानाने त्या घटनेची  जबाबदारी सिद्ध करण्याची वेळ विवादास्पद ढाचा पाडणाऱ्यां विरूद्ध खटल्यामध्ये केंद्र सरकारची वा फिर्याद करणाऱ्यांची होते. मात्र परिस्थिती पाहता मनोहर जोशी यांच्या बरोबर कारसेवेकरता गेलेले शिवसैनिक तिथे पोचलेच नव्हते .ते लखनऊला एक दिवस उशिरा पोहोचले .त्यापूर्वीच घुमट पाडण्यात आले होते. त्यामुळे सुंदरसिंग भंडारी यांनी ते काम शिवसैनिकांचे असावे असे जे विधान केले त्यामागे मोठ्या व्युहरचनेची आखणी होती हे स्पष्ट होते. याचे कारण त्यावेळी सुंदरसिंग भंडारी यांना विचारलेल्या प्रश्नांमध्ये भाजप ,विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल यांनी मशीद पाडण्याचे काम केले नाही तर ते शिवसेनेने केले का? असे विचारल्यावर ते शिवसेनेने केले असावे असे उत्तर आपल्या मंडळींना वाचवण्यासाठी सुंदरसिंग भंडारी यांनी दिले होते. यात त्यांनी भाजप ,विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी  वाचवले .त्याचबरोबर बाळासाहेबांनीही शिवसैनिकांना वाचवले असेच म्हणावे लागेल.त्यामुळे हे षडयंत्र असावे असे म्हणण्याला जागा आहे. कारण न्यायालयात हा खटला उभा राहिला तर शिवसैनिक तिथपर्यंत पोहोचलेच नव्हते हे फिर्यादीला उत्तरा दाखल स्पष्ट करता आले असते .आणि भाजप व त्यांच्या सहयोगी पक्षांना संघटनांना आरोपी केलेच नसल्यामुळे त्यांना न्यायालयात उभे करणे अशक्य होते. थोडक्यात भारतीय जनता पक्ष त्यातील प्रमोद महाजन , सुंदरसिंग भंडारी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तिघेही सध्या हयात नसल्याने याची शहानिशा करणे अवघड आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली रथयात्रा निघाली त्या लालकृष्ण अडवाणी यांनी आता ते सांगितले तर आणि तरच त्यावर विश्वास बसू शकतो ,मात्र ते काही बोलतील असे वाटत नाही. थोडक्यात नसलेला साप दाखवून भुई धोपटण्याचा मार्ग हीच या व्युहरचने मागील योजना असावी. त्यामुळे आपल्या काटकुळ्या दंडात नसलेल्या बेडक्या फुगवत संजय राऊत यांनी आम्ही बाबरी मशीद पाडली तेव्हा हे कुठे होते कुठे  पाय लावून पळाले हे सांगण्याचे कारण नाही. त्यावेळी ना उद्धव ठाकरे गर्दीचे फोटो काढण्यासही तिथे गेले होते ना शिवसैनिकांनी ते घुमट पाडतानाचे वार्तांकन संजय राऊत यांनी केले होते. केवळ वडिलांच्या पुण्याईवर राम मंदिर निर्माणात हक्क दाखवणे फारसे संयुक्तिक नाही .त्यातूनही तात्कालीन शिवसेनेने बाबरी मशीद जमीन दोस्त केली असेल पण राम मंदिराची उभारणी शिवसेनेने नक्कीच केली नाही यात कोणाचे दुमत असणार नाही. सहाजिकच ज्यांनी हे मंदिर उभारले आहे, त्या संयोजकांसह भारतीय जनता पक्ष हा  उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला, उद्धव ठाकरे यांना लोकार्पण सोहळ्यापासून लांब ठेवतील किंवा एका विशिष्ट अंतरावर ठेवतील यात शंका नाही.
.
मधुसूदन पतकी
28.12.2023

Comments

Popular posts from this blog

संविधान धोक्यात ?

हम पांच