उमेदवार निवडच अटीतटीचची
उमेदवारी ठरवणे अटीतटीचे
महाराष्ट्रात काँग्रेसने स्वबळाची भाषा केली तर त्याचा लाभ इंडिया आघाडीला होणार नाही, हे नक्की आहे. याचा फायदा भारतीय जनता पक्ष नक्कीच घेईल हेही पक्के आहे. अर्थात सातारा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर निवडणूक अटीतटीची होण्यापेक्षा उमेदवारी ठरवणे हा मुद्दाच अधिक अटीतटीचा होईल, कळीचा होईल असे सध्या तरी वाटत आहे.
सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हालचालींना जोरदार वेग आला आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या पत्रकार परिषदांमधून त्याचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचा दिनांक 14 जानेवारी रोजी महायुतीचा मोठा मेळावा ही घेण्यात येणार आहे. यामधून उमेदवारांच्या नावांची चाचपणी होण्याची दाट शक्यता नक्कीच आहे. अर्थात सर्वच पक्ष लोकशाही तत्त्वांना व धोरणांना अनुसरून चालत असले, तरी बऱ्याचशा गोष्टी पूर्वी निश्चित करून मग त्याला सामूहिक मान्यता मिळवली जाते. आणि अशा उलट्या प्रक्रियेला सुध्दा लोकशाही असेच म्हटले जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बैठका महामेळावे हे घेतले गेले तरी निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांना उमेदवारी द्यायची आहे, त्यांची पक्की यादी त्या त्या पक्षांच्या पक्षप्रमुखाकडे आणि निवड समितीकडे नक्कीच असेल. केवळ ;आम्ही उमेदवार लादला असे आरोप नंतर नाराजी निर्माण होऊ नये याकरता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री आणि साताऱ्याकडे ज्यांनी विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे; असे अजय कुमार मिश्रा दस्तूर खुद्द साताऱ्यात येऊन चर्चा व विचार विनिमय करताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षातून उमेदवारी मिळवलेल्या उदयनराजे भोसले यांना पराभूत करणाऱ्या खासदार श्रीनिवास पाटील यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या नावाचे वातावरण तापवण्यासाठी हे आवश्यक असते. खासदार श्रीनिवास पाटील हे केवळ शरद पवार नव्हे तर सर्वच पवार कुटुंबियांचे अत्यंत विश्वासातले राष्ट्रवादीचे नेते आहेत. सुप्रिया सुळे, शरद पवार या दोघांचा विश्वास खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावर आहे. श्रीनिवास पाटील पिंपरी चिंचवडचे आयुक्त होते, तेंव्हा पासून व त्यापूर्वीही महाविद्यालयीन कालखंडापासून शरद पवार यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने जोडले गेले आहे. एक वेळ घरात दगाफटका होऊ शकतो ,झाला.मात्र अत्यंत निस्पृहपणाने झालेल्या मैत्रीच्या आणि अशा कालखंडात झालेल्या मित्रत्वाच्या नात्याने दगा फटका केल्याचे फारसे ऐकवा नसल्याने शरद पवार यांच्या दृष्टीने श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारी फार कोणी विरोध करेल अशी शक्यता नाही.
साहजिकच शरद पवार यांच्या दृष्टीने ज्या चार जागा म्हणजेच खासदार त्यांच्याकडे उरले आहेत त्यातील ही अत्यंत महत्त्वाची जागा आहे. श्रीनिवास पाटील अभ्यासू आहेत. प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. शासन , प्रशासन याचबरोबर सर्वसामान्य जनतेची नाळ ओळखण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. पक्षातील कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांची त्यांना खडान् खडा माहिती आहे. त्यामुळे केवळ सातारा लोकसभा जागेपुर तेच नव्हे तर संसदेतही आणि राज्यभरात त्यांची उपस्थिती लोकसभेतील त्यांचा वावर हा शरद पवार गटासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ज्या चार खासदारांना पुन्हा निवडून आणण्याचे आव्हान शरद पवार आणि त्यांच्या गटा पुढे आहे त्यातील सहजासहजी निवडून येणारी जागा म्हणून आज तरी श्रीनिवास पाटील यांच्या जागेकडे शरद पवार गट पाहतो आहे.
दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष यांची ताकद राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांच्या युती मधल्या मदतीमुळे भक्कम होणार आहे. यापूर्वीही शिवसेना आणि भाजप ही युती होती मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये फूट पडल्यामुळे एकूणच राजकीय परिस्थिती गुंतागुंतीची झाली होती. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारा सातारा जिल्ह्यातील गट त्याचबरोबर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारा दुसरा गट हे थेटपणे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या विरोधात उभे राहणाऱ्या विरोधी पक्षातील उमेदवाराशी निगडित आहेत. मात्र आज एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या गटाची ताकद सातारा जिल्ह्यात अधिक आहे. ही ताकद भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मिळाली तर उमेदवार विजयी होऊ शकतो. भारतीय जनता पक्षातून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यामुळे बरेच जण इच्छुक राहू शकतात.
अर्थात या जागेवर सातारा लोकसभा मतदारसंघासाठी तीनही पक्ष दावा करू शकतात. याचे कारण म्हणजे सातारा हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर एकदा हिंदुराव नाईक निंबाळकर लोकसभेची निवडणूक जिंकले आहेत. सहाजिकच शिवसेना एकनाथ शिंदे गट या जागेवर आपला हक्क सांगेल. काँग्रेस मधून फुटून बाहेर पडल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा आणि आता अस्तंगास गेलेल्या कराड लोकसभा मतदारसंघात पक्ष स्थापनेपासून आपला उमेदवार कायम विजयी ठेवला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसही म्हणजेच अजित पवार गट आपल्या उमेदवारासाठी ही जागा मागू शकतात. तर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर खासदार उदयनराजे भोसले यांनी मागची पोटनिवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेने ही जागा भाजपला दिली होती. मात्र 2019 सालात या जागेवर त्यावेळी मनाने भाजपचे मात्र जागा शिवसेनेची आहे म्हणून देहाने शिवसेनेत गेलेले माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती.(कोरेगाव विधानसभा मतदार संघातही महेश शिंदे असेच त्यावेळच्या शिवसेनेचे उमेदवार ठरवले गेले होते.गोहाटी मार्गेते परत शिंदे शिवसेनेत आले.आगामी निवडणूक ते भाजप कडून लढततील की शिवसेनेतून, प्रश्न पडतो आहे.) सहाजिकच खासदार उदयनराजे भोसले यांच्याकरता एकनाथ शिंदे गट तडजोड करू शकतो ,मात्र अजित पवार राष्ट्रवादी गट ही तडजोड करेल का हा प्रश्न आहे.
याचाच अर्थ या तीन पक्षांच्या बरोबर सत्तारूढ महायुतीला जागा निश्चितीच्या धोरणाबाबत सातारा लोकसभा मतदारसंघासाठी निर्णय घेणे भावनिकरित्या सोपे नाही. कोणी दोन पावले मागे सरकायचे, लोकसभेच्या जागेच्या बदल्यात विधानसभेच्या कोणत्या जागा कोणी पुढील निवडणुकीत पदरात पाडून घ्यायच्या, याशिवाय आणि कोण कोणत्या तडजोडी करायच्या याबाबत जोपर्यंत एकमत होणार नाही तोपर्यंत हा प्रश्न कायम राहणार आहे.
सध्या शंभूराज देसाई, जयकुमार गोरे,महेश शिंदे , शिवेंद्रसिंहराजे भोसले ही मंडळी शिवसेना, भाजपचे आमदार म्हणून नेतृत्व करत आहेत, तर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा सातारा जिल्हा केवळ पृथ्वीराज चव्हाण यांच्या आमदारकीचे अस्तित्व टिकून आहे.मकरंद पाटील कुंपणावर आहेत तर बाळासाहेब पाटील शरद पवार यांच्या बाजूने १००% आहेत. मात्र रामराजे गट अजित पवार यांच्या बाजूने आहे.
लोकसभा निवडणुकी संदर्भात एकूण पाच पक्षांच्या उमेदवारांची चर्चा होते, तिथे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा उल्लेखही होत नाही व इच्छुकांची यादी किंवा नाव याची चर्चा होत नाही. हा काँग्रेसच्या दृष्टीने दुर्दैवाचा भाग म्हटला पाहिजे.
शरद पवार यांनी धक्कातंत्राची चाल चालत पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने लोकसभा उमेदवारी दिल्यास व सातारा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली तर वेगळे चित्र असेल. (अर्थात हे होण्पयाची शक्यता फारच कमी आहे.पृथ्वीराज चव्हाण लोकसभेसाठी उभे राहतील का हा पण प्रश्नच .) परंतु शरद पवार या जागेच्या बदल्यात काँग्रेस कडून काय काय घेतील, काय मागणी करतील यावरही पुढील चित्र अवलंबून असेल.
सध्या तरी काँग्रेसचा मूड स्वबळावर लोकसभेच्या जागा लढवण्याचा आहे. एकीकडे इंडिया आघाडी एकास एक उमेदवार देशभरात देण्याच्या तयारीत असताना, महाराष्ट्रात स्वबळाची भाषा झाली तर त्याचा लाभ इंडिया आघाडीला होणार नाही हे नक्की आहे. याचा फायदा भारतीय जनता पक्ष नक्कीच घेईल हेही नक्की आहे. अर्थात सातारा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर निवडणूक अटीतटीची होण्यापेक्षा उमेदवारी ठरवणे हा मुद्दाच अधिक अटीतटीचा होईल, कळीचा होईल असे सध्या तरी वाटत आहे.
.
मधुसूदन पतकी
09.01.2024
Comments
Post a Comment