वर्षातला सात मजली हास्यविनोद

वर्षातला सात मजली हास्यविनोद 

भाजपला प्रादेशिक पक्ष संपवून टाकायचे आहेत, आणि विरोधकांच्या रागाला कुकरच्या शिट्टी प्रमाणे काँग्रेस क्षोभाची वाफ घालवण्याकरता संसदेमध्ये पाहिजे आहे.
भाजपचा हा डाव ओळखून काँग्रेसने आपली वाटचाल केली तर लोकसभेबरोबर काही राज्यात विधानसभेतही ते यशस्वी होतील.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वर्ष संपता संपता या वर्षातला सगळ्यात मोठा विनोद नागपूर येथील त्यांच्या भाषणात केला. भारतीय जनता पक्षामध्ये गुलामगिरी आहे. तर काँग्रेसमध्ये ही गुलामगिरी कधीच नव्हती असे वक्तव्य त्यांनी बेधडकपणे केले आहे. त्यांच्या या वक्तव्याला हसून दाद दिल्याशिवाय विनोद समजणाऱ्याला राहता येणार नाही. खरे तर काँग्रेस पक्षाची ओळखच परिवारवादी पक्ष किंवा एककुटुंबचालकांवर्तित पक्ष म्हणून आहे. नेहरू -गांधी घराणे या पक्षाचे मालक आहेत आणि हा मालकी हक्क आजही त्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मान्य करतात यातच काँग्रेस पक्षामधील गुलामगिरीची भावना किती खोलवर रुजली आहे याचा साक्षात्कार होतो. गुलामगिरीची भावना काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या तसेच सामान्य कार्यकर्त्याच्या मनात इतकी खोलवर रुजली आहे की आपण गुलाम आहोत हे पण ते विसरून गेले आहेत. त्याचबरोबर ज्या गांधी घराण्याची गुलामगिरी करत आहेत त्या गांधी घराण्यालाही ही मंडळी आपली गुलाम आहेत असे वाटणे संपुष्टात आले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी काँग्रेस मधील नसलेल्या गुलामगिरी बाबत जे वक्तव्य केले त्याला हसूनच दाद दिली पाहिजे. खरे तर काँग्रेस पक्षाचा इतिहास पाहिला तर सर्वाधिक काळ काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून नेहरू, गांधी परिवारातील मंडळीच आहेत. याची थेट आकडेवारी पाहिली तर चकित होऊ . कारण इंदिरा गांधींपासून दोन वर्षांपूर्वीपर्यंत राहुल गांधी यांच्यापर्यंत काँग्रेसच्या अध्यक्षपदी अपवादात्मक केवळ या एकाच घराण्यातील मंडळी होती .याची भूल कदाचित राहुल गांधी यांना पडली असावी. राहुल गांधी यांच्या मातोश्री सोनिया गांधी याच सुमारे 22 वर्ष काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष होत्या,हे तरी  लक्षात घ्यायला पाहिजे होते. 137 वर्षाच्या कालखंडात सर्वाधिक काळ अध्यक्ष राहण्याचा विक्रम आणि पराक्रम केवळ सोनिया गांधी यांच्याच नावावर आहे. राहुल गांधी यांच्या दृष्टीने कदाचित ही गुलामगिरी नसावी.
काँग्रेस पक्ष 138 वर्षांचा झाला (आजची इंदिराजींची काँग्रेस 54 वर्षांची आहे). यातील स्वातंत्र्योत्तर काँग्रेसाध्यक्ष तपासले तरी लक्षात येतं की, नेहरू-गांधी घराण्याच्या गुलामीतच काँग्रेस पक्षाचा आणि काँग्रेसजनांचा बहुतांश काळ गेला. मागील 77 वर्षात फक्त  नेहरू-गांधी कुटुंबातल्यां पाच जणानी 41 वर्षे काँग्रेसाध्यक्षपद स्वत:कडे ठेवले. (54 टक्के काळ) नेहरू चार वर्षे, इंदिराजी सहा, राजीव सात, राहुल दोन आणि सोनिया गांधी सर्वाधिक 22 वर्षे. ही गुलामगिरी नाही का  ? की या कुटुंबाची पक्षानं स्वीकारलेली अनभिषिक्त लोकशाही होती? यात नेहरूंची आणि त्यांच्या वडिलांची स्वातंत्र्यपूर्व काळातील वर्षे मोजलेलीच नाहीत. तसेच, जगजीवनराम, शंकरदयाल शर्मा, देवकांत बरूआ आणि सध्याचे मल्लिकार्जुन खडगे या गांधी घराणेनिष्ठ अध्यक्षांची एकूण अकरा वर्षे हिशेबात धरली तर, 77 पैकी 52 वर्षे (67 टक्के- दोनतृतीयांश काळ) पक्षाचा कारभार एकाच कुटुंबाने चालविला. याला गुलामी म्हणतात नाही का?
पी. व्ही. नरसिंहराव आणि सीताराम केसरी यांनी गांधी हायकमांडकडे दुर्लक्ष केले आणि स्वत:वर संकट  ओढवून घेतली,  हेही देशातील जनतेने पाहिले. राजीवजींच्या निर्घृण हत्येनंतर नरसिंहराव यांना पंतप्रधान आणि कॉंग्रेसाध्यक्ष बनविण्यात आले. तेंव्हा सोनिया गांधी राजकारणात रस घेत नव्हत्या. परंतु, दरबारी कॉंग्रेसनेत्यांना हेच नको होते. नरसिंहरावांनी सोनियाजींशी सुरक्षित अंतर राखून त्यांना फारसे महत्त्व दिले नाही. याचा इतका वाईट परिणाम भविष्यात झाला की, नरसिंहरावांचे पार्थिव कॉंग्रेस मुख्यालयात आणूच दिले गेले नाही. प्रवेशद्वाराजवळील फूटपाथवर एका कर्मचाऱ्याने त्यांच्या पार्थिवाला हार घातला. ! माजी पंतप्रधान असूनही त्यांचा अंत्यसंस्कार दिल्लीत होणार नाही, याचा बंदोबस्त डॉ. मनमोहन सिंग यांच्या मार्फत करवून घेण्यात आला. शेवटी काँग्रेसविरोधक चंद्राबाबू नायडू यांनी तेलुगू अस्मितेसाठी हैदराबादला अंत्यसंस्कार करवून काँग्रेसला जागा दाखवून दिली . माजी पंतप्रधान आणि माजी पक्षाध्यक्षाचा असा अपमान सर्व कॉंग्रेसनेत्यांनी-कार्यकर्त्यांनी मुकाट्यानं सहन करून घेतला. हीच गुलामगिरी होती.
 नरसिंहरावानंतर अध्यक्ष झालेले सीताराम केसरी यांचे तर सामानसुमान रस्त्यावर फेकून त्यांना बेघर करीत अध्यक्षपदावरून पायउतार व्हायला भाग पाडले गेले. कारण ? ते सोनियांसाठी अध्यक्षपद वेळेआधी सोडायला तयार नव्हते. वास्तविक, त्यांच्या मर्जीनंच केसरींनी शरद पवारांना हरवून अध्यक्षपद जिंकले होते. पण दरबाऱ्यांनी सोनियांना गळ घालून केसरीचाचाची अशी गत केली. याचा निषेध करण्याची अपेक्षा गुलामांकडून कोण करणार ? 
 पंतप्रधानपदाचंही तसंच. 76 वर्षातील 56 वर्षे कॉंग्रेसचे पंतप्रधान राहिले (73 टक्के काळ) आणि त्यातील 38 वर्षे (67 टक्के आणि देशाच्या 50 टक्के काळ) एकट्या नेहरू- गांधी कुटुंबाचेच तीन पंतप्रधान. जणू काही कॉंग्रेसमध्ये दुसरे कोणी लायक नव्हतेच. आताही राहुलचे, प्रियांकाचंच नाव पुढं आणणे सुरू आहे.स्वत:चे अधिकार हायकमांडकडे सोपविणारे डॉ. मनमोहनसिंग यांना मात्र गुलामगिरीचं बक्षीस म्हणून सलग दहा वर्षे पंतप्रधान ठेवण्यात आले. पण त्याचवेळी त्यांना वेळोवेळी कस्पटासमान वागविण्यातही आले.त्यांच्या आदेशाचे तुकडे तुकडे करून केराची टोपली दाखवली. याला गुलाम म्हणतात. 
इंदिराजींची निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेतून अवैध ठरल्यानंतरही त्यांच्या बंगल्यासमोर रोज देशभरातील कार्यकर्त्यांनी "इंदिराजी आगे बढो" म्हणत निदर्शनं करणे, सर्व वरिष्ठ नेत्यांनी घटनाबाह्य सत्ताकेन्द्र बनलेल्या संजय गांधीं, आणिबाणीचं, शिखांच्या शिरकाणाचं समर्थन करणे असे कॉंग्रेसजनांच्या गुलामगिरीचे धडधडीत पुरावे अनेक सांगता येतील. त्याकाळात आर. के. लक्ष्मण यांनी एक अत्यंत मार्मिक व्यंग्यचित्र रेखाटलं होते. एकट्या इंदिराजी खुर्चीवर बसलेल्या आणि इतर सर्व ज्येष्ठश्रेष्ठ पुरुष नेते त्यांच्या पुढ्यात केविलवाणे उभे ! कॉंग्रेसमधील गुलामीच्या मानसिकतेचे विदारक दर्शन. आजही तेच सुरू आहे. भाजपात पटोलेंना गुलामीची नव्हे, उद्धटपणाची, शिस्तभंगाची शिक्षा मिळाली. पण त्याचाच मतलबी अपप्रचार करायचा. याने काँग्रेसमधील गुलामीची परंपरा कशी लपणार ?
भाजपात 43 वर्षांमध्ये 11 पक्षाध्यक्ष झाले. बंगारू लक्ष्मण, व्यंकय्या नायडू, राजनाथसिंग, नितीन गडकरी, अमित शहा, जे. पी. नड्डा यांच्यासारखे सामान्य कार्यकर्ते त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत नेले. नरेन्द्र मोदीसारख्याला त्यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधान केले. स्वप्नातही येऊ न शकणारे मुख्यमंत्रिपद अनेकांना दिले. सीताराम केसरी सोडले तर असे दुसरं नाव कॉंग्रेसला सांगता येईल का?  (पण केसरीचाचाचीही शेवटी त्यांनी दुर्गतीच केली.) प्रणव मुखर्जींसारख्या एकनिष्ठाला सुद्धा पंतप्रधान बनविण्याची दानत कॉंग्रेसला कधीच दाखवता आली नाही. नेहरू-गांधी सोडून बाकी सारे नेते नेहमी क्रमांक दोनपासून खालीच. अशा पक्षाचा एक नेता दुसऱ्यांच्या गुलामीबद्दल रेटून बोलतो आणि आपण ते ऐकून घेतो, हेच भारतीय लोकशाहीचं दुर्दैव म्हणायचे. 
थोडक्यात गुलामगिरी बाबत राहुल गांधी यांनी बोलणे म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे या वर्षातला सगळ्यात मोठा विनोद ठरणार आहे .काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पक्ष संपवण्याच्या प्रचारातून काँग्रेसवर केवळ भीतीची छाया धरत आहे. भाजपला प्रादेशिक पक्ष संपवून टाकायचे आहेत, आणि विरोधकांच्या रागाला कुकरच्या शिट्टी प्रमाणे काँग्रेस क्षोभाची वाफ घालवण्याकरता संसदेमध्ये पाहिजे आहे.
भाजपचा हा डाव ओळखून काँग्रेसने आपली वाटचाल केली तर लोकसभेबरोबर काही राज्यात विधानसभेतही ते यशस्वी होतील. गुलामाला गुलामगिरीची ,आपण गुलाम असल्याची जाणीव झाली की, तो गुलामगिरीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो; असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. आज काँग्रेसजनांनाही गुलामगिरीची व्याख्या आणि समज येणे आवश्यक आहे. ती आली तर काँग्रेस पक्ष खरोखर गुलामगिरीतून मुक्त होईल.
.
मधुसूदन पतकी
२९.१२.२०२३

Comments

Popular posts from this blog

संविधान धोक्यात ?

हम पांच

अशक्त दंडातल्या बेडकीचा आक्रोश