नैतिकदृष्ट्या दंडनीय

नैतिकदृष्ट्या दंडनीय 

उठता बसता शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या तसेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृतपणाच्या गप्पा मारणाऱ्या तमाम राजकारण्यांना ही भाषा शोभणारी तर नाहीच परंतु नैतिकतेच्या दृष्टीने ही दंडनीय आहे .

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राजाराम राऊतहा विषय लिखाण, चिंतन, मनन किंवा चर्चेचा अजिबात नाही. आम्ही कटाक्षाने या विषयावर लिहिणे टाळत असतो . मात्र 2019 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर या व्यक्तीने राज्याच्या राजकारणात ज्या प्रकारे व शैलीने धुडगूस घातला आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणाची 2019 सालानंतरची उरली सुरली नैतिकता ही दिवसेंदिवस ढासळ चालली आहे. दररोज सकाळी ठराविक तसेच आपले ऐकणाऱ्या माध्यमांसमोर येऊन तर्कशून्य आणि बेफाम, बेफाट अशी बडबड करत राहणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. ते तुरुंगात होते तेवढे दिवस माध्यमांना काय ती शांतता होती. मात्र तुरुंगातून माघारी आल्यावर जो गुण त्यांनी आत्मसात केला होता, तो त्यांना गप्प बसून देत नव्हता आणि 2019 सालच्या निवडणुकीनंतर सुरू केलेली बडबड पुन्हा एकदा तेव्हापासून आजपर्यंत सुरूच आहे. लोकशाहीमध्ये विरोधी किंवा असहमतीचे मत नक्कीच प्रदर्शित करणे आवश्यक आहे. ते एका अर्थाने लोकशाहीला गरजेचे, पूरक आणि लोकशाही समृद्ध करण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. मात्र केवळ वैयक्तिक टीका, टिप्पणी तीही अत्यंत अनैतिक ,असभ्य भाषेचा आधार घेऊन वारंवार करत राहणे याने लोकशाही समृद्ध होणार नाही हे नक्की .लोकशाहीमध्ये अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. म्हणून नंगानाच घालण्यास परवानगी नाही. भाषा योग्य पद्धतीने, त्यातूनही सार्वजनिकरित्या ती वापरताना संयमाची, सभ्यतेची वापरणे आवश्यक आहे. परंतु ठाकरी नावाची बाळासाहेबांच्या नंतर निर्माण झालेली शैली पुढे सुरू ठेवण्याचा मक्ता आणि जबाबदारी आपल्यावरच असल्याच्या थाटात संजय राऊत ज्या पद्धतीने बोलत राहतात. 
वास्तविक पाहता त्याची अजिबात आवश्यकता नाही. मत व्यक्त करण्यासाठी योग्य भाषा वापरता येते. मात्र ताळतंत्र सोडलेल्या किंवा सुटलेल्या संजय राऊत यांना याचे भान नाही, ते कधीच सुटले आहे. खरे तर भारतीय जनता पक्ष, संजय राऊत यांच्यावर ,राऊतांचे ताळतंत्र सुटले आहे अशी टीका करत असतो. परंतु तशाच पद्धतीची टीका व त्यांना उत्तर देण्याचे काम नितेश राणे दररोज करत असतात. किंबहुना संजय राऊत यांना त्यांच्याच भाषेत व शैलीत उत्तर देण्यासाठी नितेश राणे यांची नियुक्ती केली आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र भाजप सारख्या शिस्तीच्या पक्षाने संजय राऊत यांच्या भाषेची धास्ती घेऊन राऊतांची भाषा उत्तरा दाखल वापरली नाही तर  राऊत यांचे म्हणणे जनतेला कबूल होईल हे मान्य करणे म्हणजे भाजपनेही आपला सारासार विचार सोडून देण्यासारखेच आहे. 
राजकारणातली नीतिमत्ता कधीच संपली आहे. भाषेचा वापरही अनियंत्रित आणि बेलगाम केला जातो, हे गेल्या अडीच वर्षात अधोरेखित झाले. सुषमा अंधारे, संजय राऊत, संजय शिरसाट, नितेश राणे अगदी उध्दव, आदित्य ठाकरे या पिता-पुत्रांनी खरंच जनतेसमोर जाताना भाषा शुद्धी करणे अत्यंत आवश्यक आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, तसेच अध्यक्ष सभापती आमदार, खासदार, मंत्री ,केंद्रीय मंत्री यांचा आदर राखणारी भाषा; किमान त्यांचा एकेरी उल्लेख टाळणे आवश्यक आहे. विचारांना विचाराने खोडून काढावे. तो विचार सामाजिक तत्त्वावर आधारित असावा. वैयक्तिक टीका टिप्पणी करणारा नसावा . याचे तरी भान राजकारण्यांनी ठेवणे आवश्यक आहे. सर्वच पक्षातील राजकारण्यांच्या अशा बोलण्याचा मतदार जनतेला वीट आलेला आहे . दुसऱ्याची लायकी काढताना आपली लायकी त्यातून निघते याचा बोध घेण्याची वेळ असे बोलणाऱ्या नेत्यांवर नक्कीच आली आहे.  यापुढे निवडणुकीचे पर्व सुरू होत आहे जाहीर सभांमधून धोरणांवर,नीतीवर , विचारांवर बोला पण वैयक्तिक टीका टिप्पणी करू नका असे सर्वच पक्षांच्या श्रेष्ठींनी आपल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सांगण्याची वेळ आली आहे. आपण आपली क्षमता कितीही झाकून ठेवली तरी दुसरी व्यक्ती ती वाकून पाहतेच याचा बोध आता विशेषतः वाचाळवीरांनी घेतला पाहिजे.
सध्या सुरू असलेल्या प्रकरणाला उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली.मातोश्री वरून फेसबुक लाईव्ह करण्याच्या नादात घरात जसे बोलतो किंवा अनौपचारिक पद्धतीने त्यांच्या शिवसैनिकांशी बोलतात तसे ते बोलत राहतात. त्यातून दरवेळी काही ना काही वादविवादाचे प्रसंग निर्माण होत असतात. ज्या शब्दावरून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले तोच शब्द, त्याच आशयाचा शब्द केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वापरला होता. सर्व राज्याने पाहिले नारायण राणे जेवत असताना त्यांना अक्षरशः भरल्या ताटावरून खरकट्या हाताने पोलिसांकरवी उचलून नेण्यात आले. त्यांना अटक केली. आज तेच शब्द, तोच आशय एकनाथ शिंदे यांना आपण वापरावा का हा साधा विचारही त्यांच्या मनात येत नसेल तर संस्कार आणि नैतिकता, विचार आणि साधनसुचिता याची केवढी मोठी फारकत झाली आहे हे स्पष्ट होते. त्यातून पैजारा, मर्द किंवा लेखात घेण्यास संकोच व्हावा असे शब्द संजय राऊत यांनीही ठामपणे वापरले आहेत .आणि ते शब्द वापरणे हा आपला अधिकार आहे असेही स्पष्ट केले आहे. 
भाषा माणसाची संस्कृती सांगत असते .संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे त्यांच्यामुळे नितेश राणे आणि अनेक वाचाळवीर यांची संस्कृती आता स्पष्ट व्हायला लागली आहे. हा  उठता बसता शाहू ,फुले, आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या तसेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृतपणाच्या गप्पा मारणाऱ्या तमाम राजकारण्यांना शोभणारा तर नाहीच परंतु नैतिकतेच्या दृष्टीने ही दंडनीय आहे .अर्थात दुसऱ्याचे वाकूनच पाहण्याची सवय असणाऱ्या या मंडळींना त्याचा विधीनिषेध नाही हे राज्यातील जनतेचे दुर्दैव.
.
मधुसूदन पतकी
३०.११.२०२३

Comments

Popular posts from this blog

संविधान धोक्यात ?

हम पांच

अशक्त दंडातल्या बेडकीचा आक्रोश